मुंबई - अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, कविता सादर करत 'मी पुन्हा येईन...', असा निर्धार बोलून दाखविला. यावेळी त्यांनी, `मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी... जलयुक्त शिवारासाठी... दुष्काळ मिटविण्यासाठी... युवामित्रांना शक्ती देण्यासाठी...' अशा कवितेच्या ओळीही सादर केल्या.
महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. ते पूर्णपणे सुटलेले नाहीत. भविष्यात आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षांत अनेक आव्हाने आली. आंदोलने झाली. आरक्षणाचे काही प्रश्न मिटले. काही अद्याप तसेच आहेत. पण सर्व प्रश्न मिटवण्यासाठी प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेला विठ्ठलरूप मानत त्यांच्या विकासाच्या वारीत मी सहभागी झालो, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
संविधानाला सर्वोच्च महत्व देत शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करत, मी महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेलाच देव मानले, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या `कदम मिलाके चलना होगा' या काव्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, मी प्रत्येकाला सोबत घेवून चाललो. दुष्काळ मिटवण्याचे प्रयत्न केले. गुंतवणूक खेचून आणली, विदर्भातला अनुशेष दूर करण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्रीनिधीचा वापर रूग्णांच्या मदतीसाठी करण्यास प्रारंभ केला. तसेच शेतीचेदेखील प्रश्न सोडवले असेही ते म्हणाले.
विरोधकांनी ईव्हिएमच्या वापरामुळे मोदी सत्तेत आले, असा उल्लेख केला होता. त्याकडे लक्ष वेधत, एकदा आपण जनतेचा पाठिंबा का गमावला याचा विचार करावा, अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.