मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा ते सातत्याने आढावा घेत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
याप्रकरणी संबंधितांवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यात जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ११ मृतदेह हाती लागले आहे.
या घटनेबद्दल माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून सुरु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. यासोबतच या दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली. मागील चार ते सहा महिन्यांपासून स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला याची माहिती दिली होती. मात्र अधिकाऱ्यांनी काम निष्काळजीपणा केला. स्थानिकांनी सांगूनही याकडे दुर्लक्ष केले गेल्याने या घटनेला जबाबदार प्रशासन आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.