मुंबई - कोरोनाच्या या संकटात मुंबई पोलीस बाधित झाले असून 16 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. गेले 2 महिने सतत काम करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या मदतीला सीआयएसएफचे 300 जवान मुंबईत दाखल झालेत. आता मुंबई आणि उपनगरातील कंटेनमेंट झोन असलेल्या परिसरात सीआयएसएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पश्चिम उपनगरात, अंधेरी पश्चिम परिसरात 60 जवानांची तुकडी आहे. या जवानांना अंधेरी पश्चिम येथील महत्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले. 8 जवान अंधेरी मार्केट, जुहू गल्ली येथे 6, तर डी. एन. नगर येथे 24 जवान गस्त घालत आहेत. याच पद्धतीने अंधेरी पूर्वेकडील साकीनाका, बांद्रा पश्चिम या महत्त्वाच्या ठिकाणी या जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यात 1666 पोलिसांना कोरोनाची बाधा -
लॉकडाऊनची रस्त्यावर 24 तास उभे राहून अंमलबजावणी करणारे पोलीस हे कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण आटोक्यात आल्याचे दिसत नाही. राज्यात 1666 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात तब्बल 183 पोलीस अधिकारी असून 1483 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील 16 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.