मुंबई - याप्रसंगी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, समाजस्वास्थ गरजेचे असते तिथे राजकारण नको. शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. उर्फीला विरोध नाही, तर तिच्या अंग प्रदर्शनाला विरोध असल्याचही त्यांनी यावेळी सांगितले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी ओंगळवाणे प्रदर्शन केल्याचा व्हिडीओ एका महिलेने मला दाखवला. (Chitra Wagh on Urfi Javed) दीड वर्षांपूर्वी या महिलेची मुलगी घाणेरड्या विकृतीला बळी पडली, असे तिने मला सांगितले. तसेच, या विकृतीला कुणी जाब विचारणार की नाही असेही त्या म्हणाल्या आहेत. त्यानंतर आम्ही हीच भुमिका घेतली आहे. दरम्यान, आता आम्ही हा नंगानाच चालू देणार नाही असा दमही त्यांनी भरला आहे. विरोध हा उर्फीला नव्हे तर विकृतीला आहे. हा विरोध कुठल्या धर्माला नाही. परंतु, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे त्या विकृतीला विरोध आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
महिला आयोग याची दखल का घेत नाही? - उर्फीसोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झाले आहे का? अशी म्हणायची परिस्थिती आली आहे. महिला आयोगाने सुमोटो का दाखल करून घेतला नाही. असे सांगत चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Chitra Wagh also criticized the Women Commission) महिला आयोगाने महिलांचा सन्मान जपायला हवा परंतु महिला आयोगाने सुमोटोही दाखल केली नाही. महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला दिला आहे.
उर्फी जावेद, चित्रा वाघ यांच्या वादात आता महिला आयोगही - सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी तिला धारेवर धरले आहे. उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत जिथे दिसेल तिथे तिचे थोबाड रंगवणार, असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी तिला दिला आहे. पण या धमकीला उर्फी मुळीच घाबरलेली नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती माझा नंगा नाच असाच सुरू राहणार असे बरळली आहे. असे बिनधास्त वक्तव्य करत तिने चित्रा वाघ यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यानंतर आता उर्फी जावेद हिच्या विरोधात कुठलीही कारवाई होत नसल्याकारणाने या प्रकरणात चित्रा वाघ यांनी थेट महिला आयोगावर आरोप केले आहेत. एकंदरीत चित्रा वाघ व उर्फी जावेद यांच्यातील तू तू मैं मैं दिवसेंदिवस वाढत असताना याबाबत आता महिला आयोग काय भूमिका घेते, ते पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.