मुंबई - ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने 35 लाखांचा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी आज मंत्रालयात सुपूर्द केला. तर मागील दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत असून तब्बल १२ कोटी ५० लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात जमा झाले आहेत.
संपूर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत 12 कोटी 50 लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. तर दुसरीकडे सीएसआरमधूनही अनेक प्रकारची मदत उपलब्ध होत आहे. इंडियन ह्यूम पाईप, रायचंद ट्रस्ट, वालचंद ट्रस्ट, इंडियन ऑइल, आयसीआयसीआय, बादल मित्तल ग्रुप, फार्म इझी, महानगर गॅस, सिप्ला फॉउंडेशन, गोदरेज ग्रुप, जेएम फायनांशियल, मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स, सत्व कंसल्टिंग, पल्लवी चोक्सी, एमएसईडीसीएल, इंडियन मर्चेंट्स चेंबर, बलदेव अरोरा ट्रस्ट, एशियन पेंट्स, हायकेल इंडिया या संस्थानी मास्क, व्हेन्टीलेटर, पीपीई किट्स, आरटी-पीसीआर मशीन, मल्टी लोडर रेडिओग्राफी सिस्टिम, मोटराइज्ड बेड्स, फ्रीजर अशी सुमारे 10 कोटी रुपयांची विविध उपकरणे व साहित्य देऊ केले आहेत.