मुंबई - केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी पाठविलेले 40 हजार कोटी रुपये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत केले असल्याचा आरोप भाजपचेच खासदार अनंत हेगडे यांनी केला. या प्रकरणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चौकशी करतील, असे शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते अनिल परब यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उचित कारवाई करतील असेही ते म्हणाले. त्यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद साधला.
हेही वाचा - पंकजा भाजपमध्येच लहानाच्या मोठ्या झाल्या, त्या कुठेही जाणार नाहीत - प्रकाश महाजन
पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारकडून नेमका तो 40 हजार कोटींचा निधी कशासाठी आला होता? निधीचा वापर झाला की नाही? तसेच हा निधी परत गेला की नाही ? यासंदर्भातची सविस्तर माहिती घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उचित कारवाई करतील. भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मुंडे-ठाकरे कुंटुबीयांचे संबंध चागले आहेत. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात असणे स्वाभाविक असे म्हणत, अधिक बोलणे त्यांनी टाळले.