मुंबई: अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्यासह शिंदे गटाचे नेते, आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला आसामला पोहोचले. कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. सत्तेत आल्यानंतर गुवाहाटीला जाण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. कामाख्या देवीचे दर्शन झाल्यानंतर एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी पूजा केली, त्याच प्रकारची ही खास पूजा होती, अशी माहिती आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा एक दिवसीय दौरा होता. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा येईन असे सांगितले होते. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली, त्या सर्वांना ते भेटणार आहेत.
मनोकामना पूर्ण : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आणि तब्बल 40 शिवसेना आमदारांना घेऊन सत्तेबाहेर पडले. त्यांच्यासह मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांनी देखील सत्तेतून काढता पाय घेतला होता. हे सर्व आमदार गुवाहाटीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. शिंदे गटाच्या या सर्व 50 आमदारांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता. दरम्यान, शिंदेंचे बंड यशस्वी झाले. राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार सत्तेत आलं. त्यावेळी एकनाथ शिंदेसह आमदारांनी शक्तिपीठ असलेल्या कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi Darshan) मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते आणि तिथे पूजाही केली होती. कामाख्या देवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि भक्तांना इच्छित फळ देते असे मानले जाते.
आसामच्या तरुणांमध्ये मुख्यमंत्र्यांची क्रेझ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीमधील उत्साही तरूण तयार (youth of Guwahati ready to welcome CM Shinde) होते. आसामच्या तरुणांमध्ये मुख्यमंत्र्यांची भलतीचं क्रेझ पाहायला मिळाली.
दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांची भावनिक प्रतिक्रीया: श्रद्धा आणि मनापासून आम्ही सर्वांनी कामाख्या देवीची पूजा केली. सर्वांना समाधान मिळाले असून सर्वजण आनंदात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर दिली. कामाख्या देवीच्या आशिर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं निर्माण झालं. असं शिंदेंनी आवर्जुन सांगितले.