मुंबई - घाटकोपरमध्ये राहणाऱ्या उर्मिला चव्हाण या ५५ वर्षीय महिलेला दूरचित्रवाणी पाहत जेवण करणे चांगलेच जीवावर बेतले आहे. टीव्ही पाहत चिकन करी आणि भाताचे जेवण घेताना हाडाचा तुकडा त्यांच्या घशात अडकला. यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. हे हाड काढण्यासाठी डोक्टरांना तब्बल १४ तासांनंतर यश आले.
उर्मिला चव्हाण या टीव्ही पाहत चिकन करी आणि भाताचे जेवण घेत होत्या. त्याचवेळी चुकून त्यांच्या जेवणातून ३ सें.मी.चा हाडाचा तुकडा त्यांच्या घशात अडकला. यानंतर त्यांना वेदना होत असल्याचे पाहून घरच्यांनी केळी खाण्यास दिली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. मध्यरात्री उर्मिला चव्हाण यांना अधिक त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना घाटकोपर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घाटकोपर येथील रुग्णालयात एक्स-रे काढण्यात आला. यामध्ये त्यांच्या घशात मोठ्या आकाराचे हाड दिसून आले. यानंतर त्यांना डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी कुर्ला येथील कोहिनूर रूग्णालयात पाठवले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आणि त्यांच्या मानेची व छातीचे सिटीस्कॅन करण्यात आले.
कोहिनूर रूग्णालयातील इएनटी हेड आणी नेक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय हेलाले यांनी सांगितले, की ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती. कारण घशात अटकलेले हाड दोन्ही बाजूंनी टोकदार होते. ते अन्ननलिकेच्या मुखाशी आडव्या स्थितीत होते. एंडोस्कोपीच्या मार्गदर्शनाने हे हाड चिमट्याने काढण्यात आले. अन्ननलिकेला नुकसान पोहोचू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. हाड काढताना काही तुरळक इजा झाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.