मुंबई - शिवसेनेत होतो तेव्हापासून 23 जानेवारी हा दिवस कायम आठवणीत राहिलेला दिवस आहे. या दिवशी सहाजिकच बाळासाहेबांची आठवण येते, अशी भावना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94व्या जयंतीनिमित्त दादर येथे अभिवादन करण्यासाठी आले असताना ते बोलत होते.
हेही वाचा - शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी
मनसेचा झेंडा बदलल्याच्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले, "लोकशाहीनुसार प्रत्येकाला आपला झेंडा आणि विचारधारा बदलण्याच्या अधिकार आहे. असे करत असताना लोकांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत राज ठाकरे हिंदुत्वाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत या विषयावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही" अमित ठाकरे राजकारणात येणार असतील तर, त्यांचे स्वागतच आहे. राजकारण्यांची मुले राजकारणी होत असतील तर त्यात वावगे काय आहे, असेही त्यांनी म्हटले.