मुंबई - मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ कोसळलेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी 709 पानांचे 83 साक्षीदार असलेले आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. 14 मार्चला हिमालय पूल कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यात 7 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले होते.
आरोपपत्रात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असून या प्रकरणातील मुख्य आरोपी निरजकुमार देसाई यांच्याकडून घडलेल्या जाणीवपूर्वक चुका, पुलाच्या जीर्ण झालेल्या लोखंडी सळयांच्या नमुन्यांचा फॉरेन्सिक विभागाचा अहवाल, मृतांचे व जखमींच्या नातेवाईकांची जबानी यासह 83 साक्षीदारांचे पुरावे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत.
मुख्य आरोपी निरजकुमार देसाईच्या विरोधातील पहिली याचिका मुंबई पोलिसांनी गुरुवारी दाखल केल्यानंतर आता लवकरच या प्रकरणातील मुंबई महानगरपालिकेचे अटक करण्यात आलेल्या 3 अभियंत्यांच्याविरोधात याचिका येत्या काही दिवसात दाखल केली जाणार आहे. 14 मार्च रोजी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले होते.