मुंबई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी विधानसभेत भ्रष्टाचाराचे आरोप केले. पुरवणी मागण्यांवर बोलताना नियमबाह्य आरोप केल्याने गरज पडल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात महसूल मंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात राज्य सरकारचा शेकडो कोटी रुपयांचा महसूल बुडल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जयंत पाटील यांनी कोणतीही नोटीस दिली नाही. त्यामुळे पाटील यांनी केलेले आरोप सभागृहच्या पटलावरन काढून टाकण्याची मागणी संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार पाटील यांनी केलेले आरोप पटलावरून काढवून टाकण्यात आले. मात्र, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा आरोप केले.
जयंत पाटील यांच्या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाटील यांनी अर्धन्यायिक प्रकरणाबाबत आरोप केले आहेत. ते ग्राह्य धरता येत नाहीत. तसेच सभागृहात आरोप करण्याआधी त्यांनी अध्यक्षांना नोटीस वेळेत दिली नाही. त्यामुळे त्यांचे आरोप काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार आहे, असे ते म्हणाले.
जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातून त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत असल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे. केवळ राजकारण म्हणून ते आरोप करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, संसदीय आयुध वापरून हा मुद्दा गुरुवारी पुन्हा विधानसभेत मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितल्याने पुन्हा सभागृहात गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे.