मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या ( Andheri East Assembly By-election ) निकालानंतर मुंबईतील राजकीय पक्षांचे धाबे काहीसे दणाणले आहे. या निवडणुकीसाठी मतदार घराबाहेर पडले नाही शिवसेनेच्या अटीतटीच्या प्रयत्नानंतरही केवळ ३३ टक्केच मतदान होऊ शकले. एकूण मतदानापैकी 14 टक्के मतदान हे नोटाला झाले ही बाब राजकीय पक्षांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईची महापालिका ताब्यात असलेल्या शिवसेनेसमोर कोणती आव्हाने आहेत याबाबत जाणकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आव्हान : अंधेरी पूर्व येथील निवडणुकीत मतदारांमध्ये नकारात्मकता असल्याचे दिसून आले आहे नोटाला झालेल्या मतदानामधून ही बाब स्पष्टपणे समोर येते त्यामुळे सर्वात आधी शिवसेना शिंदे गटाला लोकांमध्ये मिसळून काम करणे महत्त्वाचे आहे. मतदारांमध्ये निर्माण झालेली नकारात्मकता दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करायला हवे असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाने माघार घेतली असली तरी झालेल्या मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे जर मतदानाचा टक्का आगामी महापालिका निवडणूक १० टक्क्यांनी घसरला तर ती बाब मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेसाठी घातक आहे. शिवसेनेने त्या दृष्टीने प्रयत्न करून मतदारांमध्ये जायला हवे, असेही जोशी यांनी सांगितले.
शिंदे गटालाही अडचणीची निवडणूक : आगामी महापालिका निवडणूक शिंदे गटासाठी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मुळात शिंदे गट अद्याप स्वतःला सिद्ध करू शकलेला नाही. येत्या निवडणुकीच्या माध्यमातूनच त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी सरकार बाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे हे शिंदे गटा पुढील मोठे आव्हान असणार आहे. शिंदे गटाने आपल्या आमदारांच्या माध्यमातून मुंबई ताकद निर्माण करण्याचा किंवा शिवसेना ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फटका नक्कीच शिवसेनेला बसू शकतो असेही जोशी यांनी सांगितले.
मतदान केंद्रावर मतदार आणण्यात अपयशी : शिवसेना ठाकरे गट हा ऋतुजा व्यक्तींच्या विजयासाठी शिवसेनेच्या निष्ठावान शिवसैनिकावर अवलंबून होता त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांची ही मदत शिवसेनेला या मतदारसंघात होते मात्र एकूणच झालेले मतदान पाहता शिवसेना मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यात अपयशी ठरली आहे. शिवसेनेने आपल्या यंत्रणेचा आणि कार्यपद्धतीचा पुनर्विचार केला नाही तर आगामी महापालिका निवडणुकीत याचा शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो शिवसेनेच्या नेत्यांनी अजूनही लोकांमध्ये मिसळून काम करायला हवे थेट लोकांमध्ये जाऊन काम केले तरच शिवसेनेला मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. अन्यथा आगामी निवडणे ही अन्य पक्षांपेक्षा शिवसेनेसाठी अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक गिरीराज सावंत यांनी व्यक्त केले आहे.