मुंबई : मध्य रेल्वेवर आज रविवारी १९ फेब्रुवारी रोजी विद्याविहार ते ठाणे ५ व्या आणि ६ व्या लाईनवर सकाळी ११ ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक आहे. या ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या, पोहोचणाऱ्या डाउन आणि अप मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या कालावधीत वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे ट्रेन आणि मेल गाड्या उशिरा पोहोचणार आहेत. नियमित देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घोषित केला आहे.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे हार्बर लाईनवर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर, पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर तसेच हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे घराबाहेर पडण्याआधी नागरिकांना मुंबई रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे रेल्वे प्रशासनाचे आवाहन आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.
हार्बर मार्गावर ट्रेन बंद : हार्बर मार्गावर पनवेल बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यामुळे मुंबईकरांना घराबाहेर निघताना लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे लागणार आहे.
हेही वाचा : Shiv Jayanti 2023 : प्रत्येक किल्ल्यांवर का असतात शिव मंदिर? पाहा काय आहे इतिहास