मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या यंदाच्या (2021-22) केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला एकूण 7 हजार 715 कोटी तर पश्चिम रेल्वेला 7 हजार 288 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांची एकात्मिक सुरक्षा यंत्रणा, तिकीट यंत्रणा, पादचारी पूल, रेल्वे ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्ती, प्रवासी सुविधेमध्ये सरकते जिने, लिफ्ट उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
कल्याण-कसारा तिसरी व चौथी मार्गिका -
मध्य रेल्वेला यंदा 7 हजार 415 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. यामुळे कल्याण-कसारा तिसरी व चौथी लोकल मार्गिका चालवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कल्याण-कसारा 67.62 किमीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी 168.24 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनस पहिल्या टप्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सीएसएमटीला फलाटांची लांबी वाढणार -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक 10, 11, 12, आणि 13 वर 24 डब्याची गाडी उभी करण्यासाठी आणि फलाटांची लांबी वाढवण्याकरता फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटींची तरतूद केली आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अत्याधुनिक सुविधेसाठी 60 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
एटीव्हीएमसाठी तरतूद -
मध्य रेल्वे मार्गावरील जुन्या झालेल्या एटीव्हीएम (तिकीट मशीन) बदलण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील 605 एटीव्हीएम बदलल्या जाणार आहेत. यासाठी एकूण 9 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पुलाच्या कामांना चालना -
- विक्रोळी येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी 10 कोटी रुपये
- दिवा येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी 10 कोटी रुपये
- कल्याण येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी 7.17 कोटी रुपये
- दिवा-वसई दरम्यानच्या तीन रोड ओव्हर ब्रिज 3 कोटी रुपये
- दिवा-पनवेल रोड ओव्हर ब्रिजसाठी 3 कोटी रुपये
- सरकत्या जिन्यांसाठी 50.16 कोटी रुपये
- मुंबइतील पादचारी पुलांच्या कामासाठी 80 कोटी रुपये
बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे प्रकल्पाला फक्त 20 कोटी रुपये -
बहुचर्चित सीबीडी-बेलापूर-उरण या दुहेरी मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात फक्त वीस कोटीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.