मुंबई- देशात कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेले महामारीचे संकट यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर केला. या परीक्षेत 88.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल हा त्रिवेंद्रम विभागाचा लागला असून यावर्षीही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.
सीबीएसईने देशातील 13 हजार 109 शाळांतील 11लाख 92 हजार 961 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी 10 लाख 59 हजार 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 88.78. इतका लागला आहे. ही परीक्षा देश विदेशातील 4 हजार 984 परीक्षा केंद्रावर घेतली होती. या परीक्षेत 1 लाख 57 हजार 934 विद्यार्थ्यांना 90 टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. 95 टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 38 हजार 686 इतकी आहे.
सीबीएसईच्या बारावी परीक्षेत यंदाही जवाहरलाल नेहरू विद्यालय यांचा 98.70आणि केंद्रीय विद्यालय यांचा निकाल 98.62 टक्के असा सर्वाधिक असून सरकारी अनुदानित शाळांमधील निकाल 91.56 तर सर्वात कमी निकाल हा खाजगी शाळांचा 88.22 टक्के इतका आहे.
सीबीएसईच्या दिल्ली विभागाच्या परीक्षांचा अपवाद वगळता देशभरात बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाने हा निकाल जाहीर केला आहे
बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल http://cbseresults.nic.in. आणि @cbseindia29 या संकतेस्थळावर पाहता येईल.