मुंबई - मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले १३,७०० खटले लवकरात लवकर मागे घेणे तसेच कोपर्डी प्रकरणाचा निकाल तातडीने लावण्याची मागणी मराठा मोर्चा समन्वयक महेश डोंगरे यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे. या बाबतीत चर्चा करण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या १३,७०० खटले अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत. कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या आरोपींना देखील अद्याप शिक्षा झाली नाही. या संदर्भातील खटला गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे. तारखेवर तारखा सुरु आहेत. त्यामुळे शासनाने आता उज्वल निकम यांच्या ताकदीचा सरकारी वकील नेमावा आणि या केसचा निकाल लावावा, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती मराठा मोर्चा समन्वयक महेश डोंगरे यांनी दिली आहे.
कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या मृत्यूला ३ वर्षे पूर्ण होणार आहेत. १३ जुलै रोजी स्मृतीदिनानिमित्त राज्य भारतातून मराठा समन्वयकांनी कोपर्डीत यावे. या दिवशीपर्यंत निर्णय झाला नाही तर आपला निर्णय आम्हीच घेऊ, असे देखील डोंगरे म्हणाले. तसेच मराठा मोर्चा दरम्यान हुतात्मा झालेल्या युवकांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळात नोकरी मिळावी, हा शब्द पाळणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले असल्याचे डोंगरे यांनी सांगितले आहे.