मुंबई - रिया चक्रवर्तीने बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सुशांतसिंह राजपूत याची बहीण प्रियंका व मितू सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा रद्द करावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रियंका व मितू यांनी याचिका केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान सीबीआयकडून काल प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यामध्ये रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांकडे केलेली तक्रार ही कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीची असून मुंबई पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा हा सुद्धा कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यात अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून अटक होण्यापूर्वी रियाने बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने सुशांतची बहीण प्रियंका व मीतू हे बनावट प्रिस्क्रिप्शनवर सुशांतला काही औषधे देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे पुढील तपासासाठी वर्ग केला होता.
मृत्यूच्या ९० दिवसांनंतर तक्रार दाखल, हे चुकीचे- सीबीआय
यानंतर सुशांतची बहीण प्रियंका व मित्तू यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हटवण्यासाठी याचिका दाखल केली होती. सुशांत राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय तपास सुरू असून पुन्हा एकदा नव्याने गुन्हा नोंदवणे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचे असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. रिया चक्रवर्तीने सुशांत राजपूतच्या मृत्यूच्या ९० दिवसांनंतर तक्रार दाखल केलेली आहे, जी चुकीची आहे, असे सीबीआयने स्पष्ट केले.
हेही वाचा- लोकल प्रवासाबाबत सरकार सकारात्मक; सर्वसामान्य मुंबईकराला मिळणार दिवाळी भेट