मुंबई: मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, श्री समर्थ को-ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये सुधीर चिपळूणकर (वय ७० वर्षे) आणि त्यांची पत्नी सुप्रिया चिपळूणकर (वय ६९ वर्षे) यांच्याकडे केअरटेकर म्हणून पप्पू जालिंदर गवळी (वय २९ वर्षे) हा कामाला होता. त्याने 13 फेब्रुवारीला संध्याकाळी ७.०० ते ०७.३० वाजण्यादरम्यान सुधीर चिपळूणकर यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने चिपळूणकर दाम्पत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. गळ्यावर वार झाल्याने सुधीर जागीच ठार झाले. घटनेत त्यांची पत्नी सुप्रिया चिपळूणकर गंभीर जखमी झाल्या. यावेळी जखमी अवस्थेत चिपळणूकर दाम्पत्याने बचावासाठी घरातील भांडी खाली फेकली. त्यावेळी सोसायटीच्या आवारातील काही मुलांनी भांड्यांचा आवाज ऐकून धावत जाऊन सुधीर चिपळूणकर यांच्या घराची बेल वाजविली. मात्र तोपर्यंत केअरटेकर पप्पू याने तेथून पळ काढला होता.
सीसीटीव्ही फूटेजमुळे हत्येचा उलगडा: सोसायटीतील मुलांनी जखमी अवस्थेत चिपळूणकर दाम्पत्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सुधीर चिपळूणकर यांचा मृत्यू झाला. मेघवाडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ क्र. १०चे पोलीस उपआयुक्त डॉ. महेश्वर रेड्डी, मेघवाडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, डॉ. अविनाश पालवे, मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे, पोलीस निरीक्षक वैभव माळी तसेच पथकाने घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक माहिती घेतली. तसेच सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी केली. यावरून सुधीर चिपळूणकर यांच्या घरी केअरटेकर म्हणून काम करणारा पप्पू गवळी यानेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. गंभीर जखमी असलेल्या सुप्रिया चिपळणूकर यांना पुढील उपचारासाठी नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आरोपींना शिताफीने अटक: पोलीस उप आयुक्त, डॉ. महेश्वर रेड्डी, सहायक पोलीस आयुक्त, डॉ. अविनाश पालवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधार्थ पाच वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आणि आरोपीचा कसून शोध घेण्यात आला. दरम्यान आरोपी पप्पू गवळी हा सिद्धेश्वर एक्सप्रेसने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस उपनिरीक्षक बल्फेवाड, पोलीस हवालदार सुदाम नडगे, अनिल खुले, पोलीस शिपाई प्रविण सैदाणे आणि विजय पाटील यांचे पथकाने दादर रेल्वे स्थानकातून शिताफीने ताब्यात घेतले.