मुंबई- नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयाला दोन दिवस होत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील २९ आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश देऊन पर्यावरण प्रेमींना सुखद धक्का दिला आहे.
दोन दिवसाचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यादरम्यान त्यांनी सदर माहिती दिली. आरेतील मेट्रो कारशेडची झाडे तोडत असताना त्याला विरोध करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटताच २९ जणांना जामीन मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सदर २९ जणांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहे. त्यासोबतच, मेट्रोच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती देण्यात आली नसून फक्त कार शेडला स्थिगिती असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर, खातेवाटपाचा निर्णय दोन दिवसात घेणार असून राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढवा घ्यायला सुरुवात झाली आहे. राज्यात शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. त्याचा आढावा घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आमच्या संघर्षाचा सन्मान- डी. स्टॅलिन
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २९ जणांवरील गुन्हे मागे घेतले ही आनंदाची बाब आहे. त्यांनी या तरुणांचे कौतुक केले हे एकप्रकारे आमच्या संघर्षाचा सन्मान असल्याचे वनशक्तीचे संस्थापक डी. स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढू- छगन भुजबळ