मुंबई- सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील विडी कामगारांच्या तीन गृहनिर्माण संस्थांना अकृषिक आकारणीतून सूट देण्यासह त्यांच्याकडील अकृषिक कराची थकबाकी व त्यावरील दंड माफ करण्यास सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा-जातीयवादी पक्षांना पराभूत करण्यासाठी टाकलेल्या अटी आंबेडकरांनी सोडाव्यात- एकनाथ गायकवाड
सोलापूर जिल्ह्यात कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था, माँ साहेब विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था आणि स्वामी समर्थ विडी कामगार सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था या तिन्ही संस्था नागरी क्षेत्र तसेच गावठाण क्षेत्राच्या बाहेरील जमिनीवर आहेत. या जमिनीचे क्षेत्रफळ सुमारे 15 लाख 60 हजार 345 चौ.मी. इतके आहे. या तिन्ही संस्थांच्या शेतजमिनी निवासी इमारत उपयोगासाठी अकृषिक वापरामध्ये परिवर्तित केल्या आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतुदींनुसार प्राप्त अधिकारानुसार या तिन्ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ताब्यातील जमीन शासन राजपत्रात अधिसूचित करुन त्यास अकृषिक आकारणीतून सूट देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, या तिन्ही संस्थांकडे आजवर असलेली अकृषिक कराची थकबाकी तसेच त्यावरील दंड माफ करण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. विडी कामगारांचे जीवनमान उंचावले जावे, त्यांच्या घराचा प्रश्न सोडवता यावा, यादृष्टीने या सहकारी गृहनिर्माण संस्था विकसित करण्यात आल्या आहेत. अकृषिक आकारणीतून सूट दिल्याने या संस्थांतील कामगारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.