मुंबई - मंगळवारी रात्रीपासून नाताळ सणाला सुरवात होईल. जगभरात नाताळाचा उत्साह दिसू लागला आहे. या सणाबद्दल सर्व धर्मीय लहान मुलांना माहिती व्हावी, यासाठी प्रभादेवी येथील बटरफ्लाय नर्सरी स्कूलमध्ये नाताळ सण साजरा करण्यात आला.
इतर सणांप्रमाणेच नाताळ सण साजरा करून शाळेने सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करत आहे. 'शिक्षणासोबत संस्कृती' हा मूलमंत्र जपून वेगवेगळ्या धर्माचे पारंपरिक सण येथे साजरे केले जातात. लहान मुले नाताळचे आकर्षण असलेला सांता बनले होते. सर्वांनी लाल टोप्या, लाल ड्रेस यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर नाताळमय झाला आहे. या कार्यक्रमाला बच्चेकंपनीसोबत त्यांचे पालकही आवर्जून उपस्थित होते.
हेही वाचा - गोव्यात ठिकठिकाणी नाताळाची जोरदार तयारी; घरे, चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई
सांता बनलेल्या मुलांनी सर्वांना चॉकलेट, केक, फुगे अशा भेटवस्तू दिल्या. या माध्यमातून लहान वयातच मुलांवर धर्मनिरपेक्षतेचे संस्कार होण्यास मदत होते. येणाऱ्या प्रत्येक वर्षी नाताळाचे आयोजन करू, असे शाळेचे संचालक लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.