मुंबई- शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झालेला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कुर्ला येथील संसार हॉटेल जवळील शकिना या तीन मजली इमारतीला धोकादायक असल्याचे घोषित केले होते. मात्र, तेथील रहिवाशांनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले. आज या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर या धोकादायक इमारतीला पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. घटनास्थळी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती इमारत पाडण्याचे काम सुरू केले आहे.
कुर्ल्यातील संसार हॉटेल येथील रायगड चौक शकिना सदन या इमारतीतील काही भाग दुपारचा साडे बारा वाजता कोसळला. या इमारतीला पालिकेने अतिधोकादायक घोषित केले होते. १०० वर्ष जुनी ही इमारत होती. धोक्याचा इशारा दिल्यानंतरही काही कुटुंब या इमारतीत राहत होते. बिल्डर व रहिवासी यांचा काही प्रश्नांवर वाद असल्याने रहिवाशी ही इमारत सोडत नव्हते. आज काही भाग पडल्यानंतर इमारत विकासकांनी इमारतीतील रहिवाशांना अन्य ठिकानी हालविले. आता इमारतीमधील रहिवासी घरे व दुकाने रिक्त करत असल्याचे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इमारती धोकादायक असतानादेखील पालिका कारवाई करत नाही व लोकांना तेथे राहू देते. पालिकेला लोकांच्या जीवाची परवा आहे की नाही? या घटनेनंतर आता तरी पालिका कठोर कारवाई करणार की नाही? असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.