मुंबई - सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावर आपला फोटो किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर नकळत होत आहे. याचे ताजे उदाहरण मुंबईत घडलेला एक लज्जास्पद प्रकार आहे.
सोशल मीडियाचा वापर करून अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो एक आरोपी बनवायचा. नंतर हे फोटो विविध माध्यमांवर टाकून बदनामी करत ब्लॅकमेल करायचा. या आरोपीला मुंबई पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी जानम प्रदीप पोरवाल या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी फेसबुक, इन्स्टाग्राम व अन्य सोशल माध्यमांवर अल्पवयीन मुलींना सावज करत होता. जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०१९ च्या दरम्यान जानम प्रदीप पोरवाल हा आरोपी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमांवरुन अल्पवयीन मुलींशी संवाद साधायचा आणि त्यांच्याशी जवळीक साधायचा.
या मुलींशी मैत्री करून त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांचे मोबाईल नंबर घ्यायचा. त्यांच्याशी चॅट करत त्यांचे फोटो मिळवायचा. पीडित अल्पवयीन मुली आरोपीवर विश्वास ठेवून स्वतःचे फोटो पाठवीत असे. पण या फोटोत बदल करीत आरोपी अश्लील फोटो बनवायचा. आरोपी पुन्हा या अल्पवयीन मुलींना हे फोटो पाठवून त्यांना संपर्क ठेवला नाही तर पॉर्न साईटवर फोटो अपलोड करण्याची धमकी देत होता.
या प्रकरणाला कंटाळलेल्या २ मुलींनी याची माहिती त्यांच्या पालकांना दिली. पोलीस तपासात अहमदाबाद येथे राहणारा २० वर्षीय जानम प्रदीप पोरवाल हा विद्यार्थी विविध अॅपचा वापर करून अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. कलम ३५४(D),५०९,५०३,५०० आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी आरोपीला १६ मार्च २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.