मुंबई - एका तक्रारीच्या आधारे 31 मे 2023 रोजी नागपूर जिल्ह्यातील पॅराडाईज रिसॉर्ट वॉटर पार्क तिरखुरा नागपूर येथील हॉटेलवर पोलिसांनी धाड घातली. त्या धाड घालण्याच्या वेळी सहा महिला या छोट्या स्कर्टमध्ये नाचताना आढळल्या होत्या. त्या महिला त्या पुरुषांच्या पुढे नाचत असताना त्यांच्यावर पैसेदेखील उधळल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी महिलांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र यापैकी पाच महिलांनी हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांमध्ये दाखल केली. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही छोट्या स्कर्टघालून जे काम करत होतो, ते अश्लील या व्याख्येत मोडत नाही. त्यामुळेच आमच्यावरील गुन्हा रद्द करावा.
अर्जदार महिलांच्यावतीनं वकील अक्षय नाईक यांनी बाजू मांडली. त्यांनी युक्तीवादात म्हटले की, भारतीय दंडविधान कलम 294 नुसार गुन्हा दाखल आहे. मात्र, त्या मुली नाचत आहेत, ते पाहून त्या समोरच्या व्यक्तींना कुठलाही त्रास झाला. तसेच त्यांना अनैतिक वाटले असा कुठेही उल्लेखच नाही. त्यामुळे त्यांचे ते नाचणे अश्लील कृत्य ठरू शकत नाही. शासनाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील एस डोईफोडे यांनी मुद्दा मांडला की, पोलिसांच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये नमूद केलेले आहे की या नृत्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी गुप्तपणे माहिती दिली. त्याच्या आधारे हा छापा टाकण्यात आला होता.
प्रगतीशील विचारानं पाहण्याचा सल्ला- न्यायालयानं सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर छोटा स्कर्ट घालून प्रक्षोभक हातवारे करणं म्हणजे अनैतिक या व्याख्येत येऊ शकत नाही, असे न्यायालयानं निरीक्षण नोंदविले. तसेच अनेकदा सेन्सॉरशिप मंजूर करणाऱ्या चित्रपटांमध्ये कोणालाही त्रास न होता सार्वजनिक ठिकाणी आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धांमध्येदेखील अशा प्रकारचा पेहराव असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे नाचणाऱ्या महिलांवरील गुन्हा रद्द करत पोलिसांनी अशा घटनांकडे प्रगतीशील विचारानं पाहण्याचा न्यायालयानं सल्ला दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती वाल्मिकी मेनजेस आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांनी महिलांवरील गुन्हे रद्द केले आहेत.
हेही वाचा-