मुंबई - भीमा कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले तेलुगु कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणांसाठी न्यायालयाने राव यांना ५ महिन्यांचा जामीन दिला. मात्र, या पाच महिन्यांच्या काळात राव मुंबई सोडून बाहेर जाऊ शकत नाही, अशी अट न्यायालयाने घातली आहे.
पत्नीने दाखल केली होती याचिका -
राव यांच्या पत्नी हेमलता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ८१ वर्षीय राव यांना वैद्यकीय कारणांमुळे काही दिवस जामीन मिळावा. तसेच त्यांना हैदराबादला कुटुंबीयांकडे जाण्याची परवानगी मिळावी. तुरुंगात असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती व त्यांचे १८ किलो वजन कमी झाले असून आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा ते सामना करत आहेत', असे याचिकेत म्हटले होते. या प्रकरणी १ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. वरवरा राव यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने उपचार सुरू आहेत.
एनआयएने केला होता जामीनाला विरोध -
राष्ट्रीय तपास यंत्रणेने वरवरा राव यांच्या जामिनाला विरोध केला होता. वरवरा राव यांच्यावर लावण्यात आलेले कलम हे खुपच गंभीर असून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ते मुख्य आरोपींपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तीवाद एनआयएने केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांकडून नोव्हेंबर 2018 आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा दंगलीत नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी तपासात म्हटले होते. परिषदेच्या आयोजनात सहभाग असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील काहींची जामीनावर सुटका झाली. मात्र, राव अद्यापही तुरुंगात होते.