मुंबई - मुंबईत मोहरम मिरवणूक काढण्यास उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) परवानगी दिली. मात्र, काही अटींचे पालन करून मिरवणूक काढण्यास परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मिरवणुकीदरम्यान नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थानिक शिया मुस्लीम संघटनेच्या याचिकेवर न्यायाधीश एस. जे. कठावला आणि माधव जमादार यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. या याचिकेवर सुनावणी वेळी न्यायालयाने हा निकाल दिला. याचिकेत कोरोना साथीच्या दरम्यान मोहरमची प्रतिकात्मक मिरवणूक काढण्याची परवानगी मागण्यात आली होती. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने देशभरात मोहरम सणानिमित्त मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारली आहे.
ट्रकमधून निघणार मिरवणूक, कोरोना नियम पाळण्याची अट
राज्य सरकार आणि 'ऑल इंडिया इदारा ई तहाजुझ ई हुसैनियत' या संघटनेमध्ये मोहरम मिरवणूक काढण्याबाबत एकविचार झाल्यानंतर उच्च न्यायालयाला आज याची माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने मिरवणुकीस परवानगी दिली. त्यानुसार शिया मुस्लिम समुदाय ३० ऑगस्टला सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळात मिरवणूक काढू शकणार आहेत. मिरवणूक मार्गाचा रस्ता ठरविण्यात आला असून पायी नाही तर ट्रकमधून ही मिरणूक निघणार आहे.
एका ट्रकमध्ये ५ जणांना बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मिरवणूक मार्गावर शेवटचे १०० मीटर अंतर पाच व्यक्ती हातात 'ताझिया'चे चिन्ह घेवून पायी चालू शकणार आहेत. यावेळी राज्य सरकारला संचारबंदीचे १४४ कलम गर्दी आणि मिरवणूक नियंत्रणात आणण्याची गरज पडली तर लागू करण्याचे निर्देश न्यायालायने दिले आहेत.
वकील राजेंद्र शिरोडकर, शेहझाद आणि आसिफ नक्वी यांच्या तर्फे याचिका दाखल करण्यात आली होती. नियमावलीचे पालन करत मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची विनंती संघटनेने न्यायालयाला केली होती. आरोग्य विषयक नियम पाळून गणेश विसर्जनास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मिरवणूकीसही परवानगी मिळावी, असे याचिकेत म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, आम्ही जर मिरवणूक काढू दिली तर कोविडच्या पार्श्वभूमीवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. शिया पंथाचे धर्मगुरू मौलाना कलबे जव्वाब यांनी देशभरात मोहरम मिरवणुक काढण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी याचिकेत केली होती. सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले होते की, जर मोहरमच्या निमित्ताने ताजियाची मिरवणूक काढण्यास परवानगी दिली गेली तर विशिष्ट समुदायाला कोरोना पसरवण्यासाठी लक्ष्य केले जाईल.