मुंबई - 'युके'मध्ये 'SARc-COV-2' विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार युकेहून भारतात आलेल्या प्रवाशांना सक्तीने सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाणार आहे. काल (सोमवार) महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आता युकेहून भारतात आलेल्या प्रवाशांना कसे क्वारंटाईन केले जाणार, याबाबत एक परिपत्रकही पालिका आयुक्तांनी काढले आहे.
प्रवाशांना त्यांच्या खर्चाने व्हावे लागणार क्वारंटाईन -
युकेमध्ये कोरोनाच्या विकसीत विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. याचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत होऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. साथ नियंत्रण कायदा 1897 व आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 यांची मुंबई विमानतळावर कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. युकेहून थेट किंवा इतर देशातून आलेल्या प्रवाशांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाईन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
आरटीपीसीआर टेस्ट -
विमानतळावर एखाद्या प्रवाशाला लक्षणे आढळल्यास त्याला त्वरित सेव्हन हिल्स रुग्णालयात उपाचारासाठी पाठवले जाणार आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार नाही. ते ज्या हॉटेलमध्ये आहेत त्याच ठिकाणी खासगी लॅबच्या माध्यमातून पाच ते सात दिवसाच्या कालावधीत आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार असून ती निगेटिव्ह आल्यावर प्रवाशाला घरी सोडले जाणार आहे. टेस्ट निगेटिव्ह आलेल्या प्रवाशाला घरी सोडण्यात आले तरी पुन्हा त्याला सात दिवस होम क्वारंटाईन केले जाणार आहे. प्रवाशाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्याला लक्षणे नसली तरी त्या प्रवाशाला हॉटेलमध्ये 14 क्वारंटाईन किंवा कोविड-19 च्या रुग्णालयात राहावे लागणार आहे.
पासपोर्ट करावा लागणार हॉटेलमध्ये जमा -
युकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी एकूण 800 हॉटेलचे रूम लागणार आहेत. त्यात 4, 5 स्टार आणि परवडतील अशा हॉटेलमध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलवर प्रवाशांना पोहचवण्यासाठी बेस्टच्या बसचा वापर केला जाणार आहे. क्वारंटाईन असताना प्रवाशाला त्याचा पासपोर्ट हॉटेलमध्ये जमा करावा लागणार आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर किंवा टेस्ट निगेटिव्ह आल्यावर पासपोर्ट प्रवाशाला परत दिला जाईल. एअरपोर्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून पीपीई किट पुरवले जाणार आहेत. युकेतून मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य मनुष्यबळ पुरवावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
ती चूक पुन्हा नाही -
कोरोना विषाणूच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी ते मार्च दरम्यान 2 लाख प्रवासी मुंबई एअरपोर्टवर आले. त्यांच्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार झाला. त्यावेळी झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून युकेतून आलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये तर इतर देशातून आलेल्या प्रवाशांना नियमानुसार 14 दिवस होम क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.