मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा 73 हजारांवर गेला आहे. मुंबईतील काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव समजून घेण्यासाठी कोरोना हाॅटस्पाॅट ठरलेल्या ठिकाणी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १२ वर्षावरील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत.
या सर्वेक्षणात चेंबूर, माटुंगा, वडाळा व दहिसर या विभागातील १० हजार व्यक्तींचे नमुने घेतले जाणार आहेत. निती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सह अन्य संस्थांच्या माध्यमातून व स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव समजून घेण्यासाठी चेंबूर, माटुंगा, वडाळा व आर उत्तर विभागात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात येणार असून १२ वर्षांवरील १० हजार व्यक्तींचे नमुने घेण्यात येणार आहेत. पालिकेसह निती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेटल रिसर्चसह अन्य संस्थांचे सदस्य या परिसरातील लोकांच्या घरी भेट देत तेथील लोकसंख्या, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा इतिहास व अन्य आजाराची माहिती संकलित करणार आहे.
सर्वेक्षणात झोपडपट्टी वगळता अन्य सोसायटी व गृहनिर्माण संस्थांमधील निवडक व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे. ज्या घरांना सदस्य सर्वेक्षणासाठी भेट देणार आहेत, त्या घरातील व्यक्तीच्या सहमतीने रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहे. कस्तुरबा सुक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळेत व फरीदाबाद येथील ट्रांसलेशन आरोग्य विज्ञान व प्रौद्योगिक संस्था यांच्याकडे जमा केलेले नमुने पाठवण्यात येणार आहेत.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रक्ताचे नमुने घेतल्यानंतर रक्तातील ॲण्टीबाॅडीजची तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे कोरोनाची लागण होणे, कोरोनाचा फैलाव लोकांमध्ये कशा प्रकारे झाला याबाबत माहिती उपलब्ध होणार असून सार्वजनिक आरोग्याच्या धोरणात्मक निर्णयासाठी सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोना संक्रमाणाचा वाढता प्रादुर्भाव समजून घेण्यासाठी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण देशात हाॅटस्पाॅट ठरलेल्या ठिकाणी करण्यात आले आहे. याआधी धारावी, कुर्ला, देवनार, साकीनाका, कांदिवली पूर्व व पश्चिम येथे ५०० व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहेत. आता १० हजार व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. मुंबईतील कोरोना संक्रमणाचा कल समजून घेत त्यावर नियंत्रण मिळवणे हा एकमेव उद्देश या सर्वेक्षणाचा आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती समोर आल्यानंतर कोरोनाचा फैलाव रोखणे व नियंत्रण मिळवणे यासाठी आधी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीत बदल करणे शक्य होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.