मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने राणे यांना नोटीस बजावली आहे. ( BMC Notice to Narayan Rane ) राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले आहे का याची पालिका तपासणी करणार आहे. ( BMC Investigate Narayan Rane Banglow Construction ) त्यासाठी पालिकेच्या के वेस्ट विभागाने बंगल्यात जाऊन छायाचित्र आणि मेजरमेंट घेण्यासाठी येणार असल्याचे नोटीसद्वारे कळविले आहे. त्यावेळी बंगल्यासाठीचे मंजूर केलेले प्लान आणि अधिकृत कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगितले आहे. यामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत.
राणेंच्या बंगल्याला पालिकेची नोटीस -
मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्ड (अंधेरी पश्चिम) च्या पदसिद्ध अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली एक नोटीस गुरुवारी मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये मालक कब्जेदाराला म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जारी करण्यात आली, ज्यात कळविण्यात आले की के -पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक 18/02/22 रोजी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी कर्मचार्यांसह आवारात किंवा CTS क्रमांक 997 आणि 997-A मध्ये प्रवेश करीन. त्यावेळी मोजमाप व छायाचित्रे घेण्यासाठी उक्त परिसराची पाहणी करेल. त्यावेळी बंगल्याचे बांधकामावेळचे मंजूर करण्यात आलेले प्लान, बंगल्याच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्यात यावीत अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा - Kirit Somaiya Visiting Korlai Alibag : कोर्लईला भेट देऊन सत्य समोर आणणार - किरीट सोमैया
तर बांधकाम तोडले जाऊ शकते -
पालिकेने दिलेल्या नोटीसीनुसार पथक जाऊन बंगल्याची आणि परिसराची पाहणी करेल. प्रत्येक बांधकामाचे मोजमाप घेतले जाईल. ज्यासाठी बांधकामाची मंजुरी दिली आहे का तेच बांधकाम केले आहे का हे सुद्धा तपासले जाईल. बंगला उभारताना दिलेल्या मंजुरी नुसार बांधकाम केले नसल्यास किंवा त्यात काही बदल केले असल्यास ते बांधकाम पालिकेकडून तोडले जाऊ शकते. अशीच कारवाई याआधी सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घरावरही झाली होती.