मुंबई - शहरात पक्षी आणि प्राण्यांसाठी रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला खाद्य टाकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे खाद्य टाकणे बेकायदेशीर असल्याने खाद्य टाकताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र त्यानंतरही मुंबईत सर्रासपणे कबुतरांना व पक्ष्यांना दाणे घातले जात आहेत.
हे प्रकार सुरूच असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर नियमाची कडक अंमलबजावणी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा प्रकारच्या सूचना पालिकेच्या विभागीय कार्यालयांना देण्यात आल्याची माहिती बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.
मुंबईत प्राणी आणि पक्ष्यांना खाद्य घातले जाते. पक्ष्यांना आणि कबुतरांना दाणे घालण्यात येतात. मात्र त्यांची विष्ठा आणि त्यांच्या पंखांतून पडणाऱ्या जंतूंमुळे श्वसनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कबुतरांना दाणे घालण्यास अनेकदा विरोध होतो. यासंदर्भात वरळीतील एका सोसायटीतील प्रकरण न्यायालयात गेले होते. दिवाणी न्यायालयाने घराच्या बाल्कनीतून कबुतरांना दाणे घालता येणार नाहीत, असा आदेश दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा आदेश तसाच ठेवून कबूतरांना दाणे घालू नयेत, असा आदेश दिला. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय (वॉर्ड) कार्यालयांना दिले आहेत.