मुंबई- कोरोनाच्या रुग्णांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईत 18 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 60 वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता पालिका, राज्य सरकार व खासगी मोठ्या रुग्णालयात 60 वर्षांवरील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. इतर रुग्णांवर मात्र मॅटरनिटी होम, गेस्ट हाऊस, हॉल आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसे परिपत्रक महापालिकेकडून काढण्यात आले आहे.
![bmc decides only above sixty years old patient admitted in big hospital](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-corona-60up-7205149_04042020083650_0404f_1585969610_491.jpg)
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आढळून आले आहेत. मुंबईमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 278 झाला असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुसंख्य हे 60 वर्षांवरील रुग्ण आहेत. 60 वर्षांवरील रुग्णांना इतरही आजार असल्याने त्यांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेता यावी म्हणून सर्व सोयी असलेल्या कस्तुरबा, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल, नानावटी, सैफी या रुग्णालयातच या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
इतर रूग्णांसाठी मॅटरनिटी होम बिल्डिंग नागपाडा, लिलावती हॉस्पिटलजवळचे मॅटरनिटी होम, अंधेरी येथील पीडब्लूडीचे गेस्ट हाऊस, डायग्नोस्टिक सेंटर पंजाबी गल्ली, एमसीएमसीआर पवई, अर्बन हेल्थ सेंटर शिवाजी नगर, बांद्रा तलावासमोरील महात्मा गांधी हॉल या ठिकाणी विलगीकरण (आयसोलेशन) सुविधा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालये कमी पडत असल्याने आता इतर ठिकाणीही त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.