मुंबई - महापालिकेकडून नाममात्र दराने भाडेतत्वावर भूखंड मिळवून क्लब उभारण्यात आले आहेत. या क्लबमध्ये महापालिका आणि अग्निशमन नियमांची अंलबजावणी करण्यात आलेली नाही. अशा क्लबवर कारवाई न करण्याच्या बदल्यात पालिका अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी संबंधित क्लबची मेंबरशिप मिळवत आहेत. अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी पालिका सभागृहात केली.
मुंबई महापालिकेचा शिवाजी पार्क येथील कर्मचाऱ्यांचा जिमखाना बंद करून त्याठिकाणी नवे महापौर निवासस्थान उभारले जाणार आहे. त्याबदल्यात महालक्ष्मी येथे पालिका अधिकाऱ्यांसाठी जिमखाना उभारला जाणार आहे. महालक्ष्मी येथे जिमखाना उभारला जावा याबाबतचा प्रस्ताव स्थापत्य समितीत राखून ठेवण्यात आला होता. आज या प्रस्तावावर फेरविचार करावा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. त्यावर हा जिमखाना फक्त अधिकाऱ्यांसाठी न उभारता त्यात पालिकेच्या कर्मचारी आणि नागरिकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी उपसूचनेद्वारे केली.
कारवाईची भीती दाखवून अधिकारी घेतात मेंबरशिप
वरळी येथील एनएससीआय सारख्या मोठ्या क्लबकडून अग्निशमन नियमांची पायमल्ली केली गेली आहे. अनेक बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. या क्लबला कारवाईची भीती दाखवून मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे, उपायुक्त चंद्रशेखर चोरे, सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी मेंबरशिप घेतली. असाच प्रकार इतरही क्लबमध्ये झाला आहे. अधिकारी कारवाईची भीती दाखवून मेंबरशिप मिळवत असतील, तर नागरिकांचे १०० कोटी खर्च करून त्यांच्यासाठी जिमखाना उभारण्याची गरज काय असा प्रश्न कोटक यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी नगरसेवक नावापुरते ट्रस्टी असून पालिकेच्या भूखंडावर नगरसेवकांना प्रवेश मिळत नाही, अधिकाऱ्यांना मात्र मेंबरशिप दिली जाते याची चौकशी करावी तसेच पालिकेच्या भूखंडावर असलेल्या कोणत्याही क्लबमध्ये पालिका अधिकारी सदस्य बनू शकत नाहीत असा कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली. तर समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी माझ्याकडे अशा प्रकारे मेंबरशिप मिळवलेल्या अधिकाऱ्यांची यादी असून ती सभागृहात सादर करू शकतो, असे सांगितले
शिवाजी पार्कवर महापौर बंगला -
मुंबईच्या महापौरांचा बंगला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आरक्षित करण्यात आला आहे. याकारणाने महापौरांना राणीबागेतील पर्यायी बंगल्यात निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापौरांना नव्याने बंगला कुठे मिळणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. आज सभागृहात शिवाजी पार्क येथील जिमखाना बंद करून महालक्ष्मी येथील जिमखान्यात सामावून घेतला जाणार आहे. शिवाजी पार्क येथील जिमखान्याच्या भूखंडावर महापौर बंगला उभारला जाणार असल्याची माहिती सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिली.