पुणे: विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीतच या शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले आहे. त्यावेळेसचे शिक्षण उपसंचालक आहिरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र या शाळेकडे आढळून आले आहे; परंतु या पत्राचा आवक जावक क्रमांक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित शाळेकडे असणाऱ्या मान्यता पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.
शाळेविरुद्ध अहवाल सादर: प्राप्त माहितीनुसार ब्ल्यू बेल्स ही स्वयंम अर्थसाहित शाळा असून २०१९ मध्ये ही शाळा सुरू झाली. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग शाळेत सुरू आहेत. या शाळेकडे उपलब्ध असणारे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मान्यता प्रमाणपत्र बोगस आहे. पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याची खातरजमा केली आहे. या सर्व बाबी विचारात घेत राज्य शासनाचे मान्यता प्रमाणपत्र खरे आहे की खोटे, याबाबतची माहिती तपासावी लागणार आहे. शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचा अहवाल राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना सादर करण्यात आला आहे.
शाळेचा खुलासा: अगोदरच दहशतवादी संघटनेच्या लोकांकडून या शाळेच्या दोन मजल्याचा वापर केल्याने या शाळेवर टीका होत आहे. परंतु या शाळेचा आणि त्या मजल्याचा काही संबंध नाही, असा खुलासासुद्धा शाळेने केला होता. मात्र आता हा नवीनच माहिती उघड झाल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे तर नुकसान होणारच आहे. परंतु या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार आणि अशा शाळेमुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा होणारा त्रास यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पुण्यात एनआयएची मोठी कारवाई : दहशतवादविरोधी एजन्सीने ब्लू बेल शाळेच्या इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला जप्त केला आहे. या इमारतीचा वापर पीएपआयकडून भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवायांची योजना आखण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी केला जात होता. यानंतर एनआयएने या शाळेच्या इमारतीच्या दोन मजल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. याबाबतची माहिती एनआयएने दिली आहे.
काय आहे प्रकरण: NIA च्या म्हणण्यानुसार, PFI ही संघटना निष्पाप मुस्लिम तरुणांना एकत्रित करून त्यांचे माथे भडकवत होती. तसेच 2047 पर्यंत देशात इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपवण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना सशस्त्र प्रशिक्षण देखील पीएफआय संघटना देत होती. अशाचप्रकारचे काम पुण्यातील या शाळेच्या दोन मजल्यावर सुरु होता. त्यामुळे कारवाई करत दे दोन्ही मजले जप्त केले आहेत.