मुंबई: आपल्या या बासरी वादनाबाबत इरशाद शेख सांगतात की, मी सुरुवातीपासूनच बासरी वादक नव्हतो. शाळेत असताना मी गायकी करायचो. माझा आवाज चांगला आहे. मला गाणी म्हणायला आवडतात. आमच्या शाळेत बऱ्याच बासऱ्या होत्या. मात्र त्या कुणाला जमत नसल्याने पडून होत्या. एक दिवस आमच्या संगीत शिक्षकांनी त्या सर्व बासऱ्या बाहेर काढल्या. आम्हाला सांगितले, ज्याला परफेक्ट स्वर ज्ञान असेल त्यालाच या बासरी मिळतील. तोच उत्तम बासरी वादक होऊ शकतो. तेव्हा आम्हाला सरांनी प्रश्न विचारला होता एकूण स्वर किती? आमच्या वर्गात एकूण 15 ते 20 आम्ही विद्यार्थी होते. त्यातल्या सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली. काहींनी पंधरा सांगितले, काहींनी 20 सांगितले, तर काहींनी 7 सांगितले. या सर्वांमध्ये मी एकट्यानेच एकूण स्वर बारा आहेत, असे सांगितले.
इरशाद संगीत कलेचे विद्यार्थी: माझ्या उत्तरामुळे सर खुश झाले. मात्र, त्यांना वाटले की मी, असेच अंदाजे उत्तर दिले आहे. त्यामुळे सरांनी मला आणखी काही प्रश्न विचारले. त्यांनी विचारले बारा स्वर आहेत, तर ते बारा कोणते? त्यावर मी त्यांना उत्तर दिले सात शुद्ध स्वर आहेत. चार कोमल आणि एक तीव्र असे एकूण बारा स्वर आहेत. माझ्या या उत्तरानंतर सरांना खात्री पटली. त्यांनी मला बासरी शिकवायला सुरुवात केली. मी गायनाचा विद्यार्थी असल्याने मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. मी बासरी लगेचच शिकलो, असे इरशाद शेख सांगतात.
गायक असून बासरी का निवडली? या प्रश्नावर उत्तर देताना इरशाद सांगतात की, मी उत्तम गायक आहे. पण, मला जर गायनात काही करिअर करायचे असेल तर खूप स्पर्धा आहे. गाण्याचे अनेक कार्यक्रम होतात. बरेच गायक आहेत. मी जर या गाण्याच्या स्पर्धेत उतरलो, तर माझा टिकाव लागेल का? मला एक यशस्वी गायक व्हायला किती काळ लागेल? या सगळ्याचा मी विचार केला. मग मी म्हटले आपण असे काहीतरी करू, ज्याकडे लोक सहसा वळत नाहीत. तेव्हा मी मग हातात बासरी घेतली. बासरी वादक बरेच आहेत, पण गायकांच्या तुलनेत त्यांची संख्या फार कमी आहे. म्हणून मी बासरी हातात घेतली. इथे दादरला येऊन बासरी वाजवू लागलो.
मुंबईकरांनी अनेक कार्यक्रम दिले: इरशाद शेख मागची 22 वर्ष दादर स्थानकावर बासरी वाजवत आहेत. यावर लोकांचा प्रतिसाद देखील त्यांना चांगला मिळत असल्याचे ते सांगतात. ज्यांना खरेच स्वरांची जाण आहे, ती लोक खूप वेळ माझी बासरी ऐकत असतात. काही लोक तर अशी आहेत, जे माझा नंबर घेऊन जातात. त्यांच्याकडे जर एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमात बासरी वादनासाठी मला बोलावतात. त्यातून काही पैसे देखील मला मिळतात. असे अनेक कार्यक्रम मी केले आहेत. जे याच दादर स्थानकावरून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे मला मिळाले. आजही ज्यांना माझ्या बासरीचे सूर आवडतात, ती लोक येथे थांबून मला थोडीफार त्यांच्या मनाने आर्थिक मदत करतात. यावरच माझे घर चालते, अशी माहिती इरशाद शेख यांनी दिली.