मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या देशभरात सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. मुंबई दक्षिण मतदार संघात मुंबईतील इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक दिव्यांग (अंध) उमेदवार मैदानात आहे. दुर्बल विकास आघाडीकडून राजेश दयाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राजेश दयाळ यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवार शोधून त्याला उमेदवारी देत आहे. मात्र, दुर्बल विकास आघाडी समाजासाठी काहीतरी चांगले काम करू इच्छिणाऱ्या दुर्बल व्यक्तींना उमेदवारी देत आहे. त्यांनी मुंबईत दयाळ यांना तसेच घाटकोपर येथून एका तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.
राजेश दयाळ हे १२ वी शिक्षित उमेदवार आहेत. ते बी. कॉम तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. मुंबईत पहिल्यांदाच एक दिव्यांग उमेदवार दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यासमोर शिवसेना आणि काँग्रेसचे तगडे उमेदवार आहेत. त्यामध्ये दुर्बल विकास आघाडीने हा दिव्यांग उमेदवार उभा केला आहे. तर या मतदार संघात एक वेगळेच राजकारण पाहायला मिळणार आहे.
सध्या देशभर घराणेशाही सुरू आहे. ही घराणेशाही मोडकळीस आणण्यासाठी व दुर्बल व्यक्तींवर अन्याय रोखण्यासाठी तसेच लोकसभेत दुर्बलांचे तसेच सामन्यांचे प्रश्न मांडण्यासाठी माझी उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया राजेश दयाळ यांनी दिली. माझ्यासारख्या बहुजनातील वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी, बळीराजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे, अशी प्रतिक्रिया दिव्यांग राजेश दयाळ यांनी दिली.