मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांसमोर जाण्यासाठी शिवसेनेने नुकतेच जन आशीर्वाद यात्रा काढण्याची ठरवलेले असतानाच भाजपाकडून राज्यभरात विजय यात्रा काढली जाणार आहे. यासाठी भाजपाने आपल्या विजय यात्रेसाठी 2 ऑगस्टचा तर शिवसेनेने जन आशीर्वाद यात्रेसाठी पुढील आठवड्याचा मुहूर्त शोधला आहे.
भारतीय जनता पार्टीकडून येत्या 2 ऑगस्टपासून राज्यभरात विजय यात्रा काढली जाणार असून त्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: करणार असल्याचे सांगण्यात येते. भाजपाची ही यात्रा 2 ऑगस्टपासून पुढे 25 दिवसांपर्यंत चालणार आहे. त्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात यानिमित्ताने आपली कामगिरी आणि विचार भाजप घेऊन जाणार आहे.
प्रदेश भाजपाच्या कोअर कमिटीची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही विजय यात्रा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाईल. यादरम्यान प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य परिसरात एक जाहीर सभा घेतली जाईल. यातल्या बहुतांशी सभा मुख्यमंत्री स्वतः घेणार आहेत. याशिवाय त्या-त्या भागातले पक्षाचे नेतेही या सभांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येते.
याच पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या 21 जुलैला गोरेगावच्या एनएसई कंपाऊंड येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची सभा प्रदेश भाजपतर्फे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राज्यभरातील पक्षाचे सर्व स्तरावरचे पदाधिकारी सहभागी होतील. या बैठकीतच भाजपाकडून निवडणुकीचे रणशिंग अप्रत्यक्षरित्या फुंकले जाण्याचे भाजपच्या वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले आहे.