मुबंई - विक्रोळी पार्कसाईड येथील रस्त्याची मागच्या काही वर्षापासून दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या उजव्या आणि डाव्या भागातील गटारावर अनधिकृत बांधकामे झाल्याने परिणामी कोणती घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिकांना आत येणे अवघड होते. तसेच अनधिकृत बांधकामामुळे रस्त्याकडील गटाराचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीदेखील पसरत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त असून गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे आनंदगड नाका ते स्मशानभूमी रोडचे सिमेंट कॉक्रीटीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. वार्ड क्रमांक 123चे अध्यक्ष संदीप त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली आज (रविवारी) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आनंदगड नाका येथे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात स्थानिक राहिवाशांसह भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रकांत मालकर, वकील यादव, घाटकोपर मंडळ अध्यक्ष अनिल निर्मळे, महामंत्री नीलम पांडे, मनीषा भांडारकर, रवींद्र शिगवण, आदी. उपस्थित होते. दरम्यान, या रस्त्याच्या सीसीरोडसाठी दोन महिन्यांपूर्वी स्वाक्षरी मोहीम घेऊन महानगर पालिकेकडे या स्वाक्षरी मोहीम पाठवण्यात आल्या होत्या. पालिकेकडून या रस्त्याचे टेंडर पास झाले असून लवकरच या रस्त्याचे बांधकाम सुरू होईल, असे सांगण्यात आल्याचे वार्ड अध्यक्ष संदीप त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र, अद्याप तशी परिस्थिती दिसत नाही.
हेही वाचा - महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचा भडका; जाणून घ्या आजचे दर
15 दिवस स्वाक्षरी मोहीम राबविणार -
तीन महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल, निधी प्राप्त होऊनदेखील रस्ता बनवायला इतका उशीर का होतोय? असा सवाल त्रिपाठी यांनी केला. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे, यासाठी सोमवारी 22 फेब्रुवारीपासून दररोज सायंकाळी पाच वाजेपासून रोज 15 दिवस आम्ही स्वाक्षरी मोहीम घेणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.