मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले. या सर्व प्रकल्पांचा थेट फायदा सर्वसामान्य मुंबईकरांना होणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचा यावेळी पराभव करण्याची तयारी भाजपने केली आहे. वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीएच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत त्यांनी 38 हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण केले.
या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण
मलजल प्रक्रिया केंद्र : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्याद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. ही 7 केंद्र वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची असणार आहे.
बायोगॅसपासून वीजनिर्मिती : या 7 मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे 80 टक्के लोकसंख्येला फायदा होणार आहे. या मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी रुपये १७ हजार १८२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या कार्याअंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहेत. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे.
रस्ते काँक्रिटीकरण : आज रस्ते काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अंतर्गत ३९७ किलोमीटर लांबीच्या 'रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल. या कामांसाठी अंदाजे रु. ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण होईल असा अंदाज आहे. या कामांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भागात ७२ किमी लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. या रस्त्यांच्या कामांत 'युटिलिटी डक्ट' तसेच पूर नियंत्रणात महत्वाचे ठरणारे शोष खड्डेही बनवले जाणार आहेत. या रस्त्यांचा दर्जा उत्कृष्ट असावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग बनवण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना हे काम दिले जाणार आहे. नवीन रस्त्यांचा दर्जा चांगला राहावा यासाठी दर्जेदार व्यवस्थापन संस्थाही देखभालीसाठी नेमण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी : कोविड19 आणि लॉकडाऊननंतर फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी जून 2020 मध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मुंबईतील १ लाखाहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज वाटपाचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या 24 विभागांमध्ये 2301 शिबिरे आयोजित केली होती.
रुग्णालये : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत नाहूरगांव, सिद्धार्थ महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय गोरेगांव, ओशिवरा प्रसूतिगृह, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या आरोग्य सेवांचे भूमिपूजन करण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही सर्व रुग्णालय व दवाखाने सन २०२५ च्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा - PM Modi In Mumbai : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा अभूतपूर्व विकास -पंतप्रधान