मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभेसाठी अर्ज दाखल करताना बाहेरून माणसं आणली नाहीत, असा खुलासा भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. कोथरूड मतदारसंघात पाटलांना विरोध होता. त्यामुळे अर्ज दाखल करताना त्यांनी बाहेरून माणसं आणून शक्तिप्रदर्शन केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याबाबतच भांडारी शुक्रवारी पक्षकार्यालयात बोलत होते.
पाटील भाजपचे जेष्ठ नेते आहेत. त्यांना अशा प्रकारे लोक जमा करण्याची गरज नाही. त्यांना मिळत असलेल्या समर्थनामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याचेही भांडारी म्हणाले.
विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने कोथरूड मतदारसंघात नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक ब्राह्मण महासंघाने पाटलांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांना समर्थन नाकारले असल्याचे वृत्त आहे. तसेच कुलकर्णी समर्थक देखील नाराज आहेत. अशा वातावरणात चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना बाहेरून कार्यकर्ते आणावे लागले असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याबाबत भांडारी यांना विचारणा केली असता त्यांनी विरोधकांवर आगपाखड केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाटलांच्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय काकडे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.