मुंबई - सेना भाजपचे जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष झाले आहे, ते जनतेचा विचार करत नाहीत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज (गुरुवारी) येथे केला आहे. जनतेने कौल दिलेला असतानाही ते एकमेकांविरोधात झगडत बसले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात जंगी स्वागत करण्यात आले. कोणत्या आमदाराने किती मतदान घेतले, याची माहिती देत त्यांनी मतदारसंघनिहाय घेतलेली मते आकडेवारी आणि त्याचा परिचय राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना करून देण्यात आला. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कामगार तसेच बेरोजगारी आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नावर प्रत्येक आमदारांना काम करणे आवश्यक आहे, अशी सूचना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून बैठकीत देण्यात आल्या असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत घेतली शरद पवारांची भेट
आज झालेल्या बैठकीत राज्यभरात निवडून आलेल्या आमदारांचे आम्ही स्वागत करून त्यांचा आभार प्रस्ताव आज मांडला होता, अशी माहिती थोरात यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सकाळी झालेल्या भेटीत काय चर्चा झाली, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्याविषयी आम्ही चर्चा विनिमय केली. तसेच पुढील काळात दोन्ही पक्ष मिळून कोणती भूमिका निभावता येईल, याविषयी चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.