मुंबई - पवईच्या एमएमआरडीए क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परशुराम जाधव असे वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणाची चौकशी करुन जाधव यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी भाजपने केली आहे.
मृत परशुराम जाधव यांच्या पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 4 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. तर परशूराम जाधव यांच्या पत्नीवर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरु होते. याबाबत जाधव यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव यांना ताप, खोकला आणि श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. तरीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकचे (बीएमसी) अधिकारी वेळेवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
जाधव यांची कोरोना चाचाणी करण्यात आली, मात्र, त्याचा अहवाल लवकर प्राप्त झाला नाही. त्यामुळे सर्व प्रयत्न करूनही त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. रविवारी रात्री 9 च्या सुमासारास जाधव यांचा पवईच्या एमएमआरडीए क्वारंटाईन सेंटरमध्ये मृत्यू झाला. सोमवारी पहाटे घाटकोपर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैय्या यांनी मुंबई पालिकेला पाठवलेल्या पत्र पाठवले आहे. 2 दिवसापूर्वी शिवदास कांबळे यांचाही अशाच क्वारंटाईन सेंटरमध्ये मृत्यू झाला होता. आता पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये परशुराम जाधव याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.