मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून संकल्पपत्र जाहीर करण्यात आले आहे. यावेळीही जुन्या आश्वासनांसह अनेक नवीन घोषणांची खैरात करण्यात आली आहे. यात विशेषकरून ५ वर्षात १ कोटी रोजगार निर्माण करणार, या घोषणेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण, यापूर्वी केंद्रातील मोदी सरकार २ कोटी रोजगार निर्मितीवरून चांगलेच अडचणीत आले होते.
गेल्या निवडणुकीच्या वेळी याच लोकांनी 45 लाख तरुणांना रोजगार देण्याचे वचन दिले होते. पण प्रत्यक्षात रोजगार मिळण्याऐवजी आहे त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हे लोक वारंवार खोटे बोलतात आणि खोटी आश्वासने देतात, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.
भाजपचे आश्वासन भ्रामक - पाटील
तर, भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान आपलाच प्रसिद्ध केलेला २०१४ चा जाहीरनामा पाहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने ही २०१४ सालीच दिलेली आहेत, ही आश्वासने पूर्ण का झाली नाहीत, याचेही उत्तर याच जाहीरनाम्यात भाजपने देणे अपेक्षित होते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, की याही जाहीरनाम्यात भाजपने पुढील पाच वर्षात एक कोटी रोजगार निर्माण करण्याचे भ्रामक आश्वासन दिले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात लाखो तरुणांनी नोकऱ्या का गमावल्या याचे उत्तर मात्र या जाहीरनाम्यात नाही.
पंतप्रधान मोदींच्या २ कोटी रोजगारांचे काय झाले?
२१ जुलै २०१८ ला संसदेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला होता. ''तुम्ही प्रत्येक भाषणात २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होतं, त्याचं काय झालं? प्रत्यक्षात फक्त ४ लाख युवकांना रोजगार मिळाला आहे.
यावर उत्तरात, "रोजगारावरून गैरसमज पसरवले जात आहेत, हा आधारहीन आरोप आहे, सरकारने प्रशासनात जास्तीत जास्त रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. याची आकडेवारी देशाला देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतल्याचे, मोदी यांनी सांगितले.
२०१८ ला एका खासगी वाहिनीला मुलाखती दरम्यान रोजगारावरून दिलेल्या उत्तरावरूनही मोदींवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.
काय होता प्रश्न?
मोदीजी तुम्ही १ कोटी रोजगार युवकांना देतो म्हणून आश्वासन दिले होते? तुम्हाला वाटतं का? की ते पूर्ण केले?
त्यावर उत्तरात, "तुमच्या कार्यालयाबाहेर जर एखाद्याने पकोडे विकले आणि दिवसाला २०० रुपये कमावले. तर, रोजगारच झाला ना?"
पकोड्याच्या या उत्तरावरून भाजप सरकारवर भरपूर टीका झाली होती.
१६ नोव्हेंबर २०१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील सभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील प्रचार सभेत मोदींवर पलटवार केला. "मोदींनी निवडणुकीदरम्यान २ कोटी युवकांना रोजगार, १५ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्यांनी साडेचार वर्षांत किती तरुणांना रोजगार दिला? याबद्दल चकार शब्दही काढत नाहीत, असा हल्लाबोल राहुल यांनी केला.
हेही वाचा -राज्यातील '75' मतदारसंघांचे भविष्य ठरवणार 'बंडखोर'
वास्तव -
कामगार खात्याच्या अहवालानुसार, २०१५ ते २०१६ या वर्षांत केवळ १.५५ लाख ते २.३१ लाख रोजगार निर्मिती झाली. म्हणजे २ कोटींच्या आश्वासनानुसार फक्त १ टक्के इतका रोजगाराची निर्मिती झाली.
भाजपचे महाराष्ट्रासाठी १ कोटी रोजगाराचे आश्वासन -
भाजपने मंगळवारी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात पुढील ५ वर्षात १ कोटी रोजगार देऊ, असे आश्वासन दिले आहे. २०१४ सालीही विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने ४५ लाख रोजगार निर्मिती करू, असे आश्वासन दिले होते.
हेही वाचा - लग्नासाठी गड-किल्ले भाड्याने देणे गैर नाही, उलट अर्थव्यवस्थेला फायदा - उदयनराजे भोसले
वास्तवात राज्यातील अनेक ठिकाणी कारखाने, कंपन्या बंद पडत असल्याने आहे, तेच रोजगार गमवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
त्यामुळे या निवडणुकीत दिलेले १ कोटी रोजगारांच्या आश्वासनाचे काय होणार? की मोदींच्या २ कोटी रोजगारांसाखेच हवेत विरतंय हे येणारा काळच ठरवेल.