मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रभर कोरोनाने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात काल (सोमवार) एका दिवसात 31 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन ची तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, भाजपचा या लॉकडाऊनला विरोध असल्याचे स्पष्ट मत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले आहे.
सर्वसामान्य लोकांच्या पोटावर पाय मारण्याचे काम
सरकार लॉकडाऊनची नुसती वाच्यता करत नाही हे सरकार गोरगरीब सर्वसामान्य जनतेला इशारा देण्याचे काम करत आहे. गेल्या मार्च महिन्याची आणि आत्ताच्या मार्च महिन्यामध्ये मूलभूत फरक आहे. गेल्या वेळेला आपल्याकडे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते. ह्या सर्व गोष्टी आत्ता उपलब्ध आहेत आणि त्यामुळे लॉकडाऊनबाबत सरकारने विचार करता कामा नये. उलट टेस्टिंग, आयसोलेशन आणि ट्रेसिंग ही त्रिसूत्री सरकारने पाळलीच पाहिजेत. लॉकडाऊन लाऊन सर्वसामान्य लोकांच्या पोटावर पाय मारण्याचे काम सरकार करत तर ते भाजपा कदापि सहन करणार नाही , असेही भातखळकर म्हणाले.
कोरोना रुग्णसंख्या ही सरकारची डोकेदुखी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या ही सरकारची डोकेदुखी बनत चालली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लॉकडाऊन संदर्भात तयारी करा, असे निर्देश केले होते. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका करत भाजपचा या लॉकडाउनला विरोध आहे, अशी ठाम भूमिका मांडली होती. त्यावरच भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा या लॉकडाऊन ला आमचा विरोध असून नियम कडक करा पण लॉकडाउन पुन्हा करू नका अशी मागणी केली आहे. लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्यांची पुन्हा परवड होणार त्यामुळे भाजपा या लॉकडाऊनचा विरोध करत असल्याचे भातखळकर म्हणाले.
हेही वाचा - सचिन वाझेंची आणखी एक गाडी एनआयएने केली जप्त