मुंबई - कोरोना लॉकडाऊन (टाळेबंदी) हटवून आपण राज्यात 'मिशन बिगिन अगेन' सुरू केले आहे. यामध्ये काही आणि शर्थींच्याअधीन राहून बाजारपेठा हळूहळू सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे शहरांतर्गत व राज्यातील बस प्रवासी वाहतुकही टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहे. नुकताच राज्य सरकारने हॉटेल आणि उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र, राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील सर्व मंदिरे तातडीने उघडण्याची मागणी, मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले आहे.
राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाले आहे. त्याअंतर्गत सरकारने काही अटींसह बाजारपेठा, बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. लवकरच हॉटेल आणि उपाहरगृहेही सुरू होणार आहेत. मात्र, धार्मिक स्थळे बंद का? सवाल लोढा यांनी पत्रात केला आहे. भारतीय समाज देवा-धर्माशी जोडला गेलेला आहे. कोरोना संकटाच्या काळात समाजाला धार्मिक आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर मंदिरे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपकडून लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेली गुरूपौर्णिमाही बंद मंदिरातच साजरी करावी लागली. त्यामुळे आता धार्मिक स्थळे सुरू करावीत, अशी मागणी काही ठिकाणी केली जात आहे.