मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की मुंबईचा चाकरमानी कोकणात गेलाच म्हणून समजा. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने पिच्छा सोडलेला नाही. अशा परिस्थितीतही कोकणात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदाही कोकणवासियांनी कोकणात जाण्यासाठी आधीपासूनच बुकिंग करायला सुरुवात केली होती. मात्र आमदार नितेश राणे यांच्या अभिनय प्रवास उपक्रमाअंतर्गत प्रथमच दादर ते सावंतवाडी अशी मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता ही एक्सप्रेस सुटली. येथे प्रवाशांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी रेल्वेला हिरवा कंदील दाखवताना भाजप नेते नितेश राणेही उपस्थित होते.
भाजपच्या एका आमदाराने हे काम केले - नितेश राणे
यावेळी नितेश राणे म्हणाले, की 'कोकणात जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस सोडण्यात आली आहे. भाजपच्या एका आमदाराने हे केलेले काम आहे. कोकणात एकमेव भाजपचा आमदार आहे. इतर सर्व नेते शिवसेनेचे आहेत. मात्र त्यांच्याकडून अशी काही कामं होताना दिसत नाहीत. एकटा आमदार करू शकतो तर भविष्यात भाजपला कोकणात संधी मिळाल्यास चित्र वेगळ असेल'.
तर कोरोना परिस्थितीवरही नितेश राणेंनी भाष्य केले. 'राज्य सरकारमध्ये कोरोना स्प्रेडर बसलेले आहेत. तेच कोरोना पसरवत आहेत. त्यांचे राजकीय कार्यक्रम आधी बंद करा. इथे कोणीही गर्दी करत नाही. कोरोनाचे नियम पाळूनच प्रवास करणार आहेत', असे त्यांनी म्हटले.
राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. खड्डे बुजवण्यासाठी जांभा दगडाचा वापर केला जातो. अवघ्या दोन तासात रस्ते उखडतात. चांगले आणि दर्जेदार रस्ते मिळायला हवेत, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - मोदी एक्स्प्रेस कोकणाकडे रवाना, दादर स्थानकातून ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा