मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पैसे वसुलीसाठी माणूस हवा होता, 50 कोटींची वसुली करणारा जुना शिवसैनिक हवा होता. म्हणून वाझेंना परत आणले गेले, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यांचाही हलगर्जीपणा असल्याचे सोमैया म्हणाले. सचिन वाझेच्या पाठीशी कोण-कोण राजकीय व्यक्ती आहेत, त्यांचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणेने घेतला पाहिजे आणि सगळे उघडकीस आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाझेंना का निलंबित केले होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वाझे हा राज्य सरकारचा विशेष माणूस असल्याचे दिसत आहे. एका सहायक पोलीस निरीक्षकासाठी मुख्यमंत्री समिती तयार करतात. ६ जूनला त्याचे निलंबन रद्द केले गेले. शरद पवारांनी गृहमंत्री असताना त्यांना निलंबित का केले होते? त्यानंतर २००७ मध्ये राष्ट्रवादीचे गृहमंत्री त्यांचा राजीनामाही स्वीकारत नव्हते. वाझे प्रकरणात आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी दिसत आहे. त्यामुळे वाझे हा राज्य सरकारचा विशेष माणूस असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप सोमैय्या यांनी राज्य सरकारवर केला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाझेमध्ये इतके काय दिसले की, त्यांनी त्याला परत घेतले? शरद पवारांनी त्यांना निलंबित केले होते. मग आता हे का परत घेत आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचा हलगर्जीपणा नाही तर उद्धव ठाकरेंना वसुली करायला माणूस हवा आहे. सरकार माफियागिरी करते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेला उत्तर द्यावे, असेही सोमैया म्हणाले.
हेही वाचा - 'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको', वाझेंची विशेष न्यायालयात याचिका
हेही वाचा - टीआरपी घोटाळा : ईडीचे चार ठिकाणी छापे; 32 कोटींची संपत्ती जप्त
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची तपास यंत्रणा तयार करावी - सचिन सावंत