मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी फौजफाटा तैनात केला आहे. पोलिसांनी त्यांना घरीच स्थानबद्ध केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार, असा सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला असून मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही, असे आव्हान सोमैया यांनी ठाकरे सरकारला केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार किरीट सोमैया यांनी विकास आघाडीच्या मंत्र्यांची घोटाळ्याची यादी बाहेर काढायला सुरुवात केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सोमैया यांनी केले होते. याबाबत काही बैठकांसाठी सोमैया सोमवारी (दि. 20 सप्टेंबर) कोल्हापूरला जाणार होते. मात्र, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला असून तशी नोटीसही सोमैया यांना पाठवली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सोमैया यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे. त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
कोल्हापूरला जाण्यावर सोमैया ठाम
मुश्रीफ यांनी भ्रष्टाचाराचे 98 कोटी रुपये आपल्या संस्थेत तसेच कारखान्यात गुंतवले आहेत. मी कोल्हापुरात जाऊन त्यांच्या कारखान्याची पाहणी करणार होतो. मात्र, 144 कलम लावण्यात आले असून ठाकरे यांनी माझा दौरा प्रतिबंधित केला आहे, असे सोमैया म्हणाले. राज्य सरकारने माझ्या घरी पोलीस पाठवले आहेत. मात्र, काही झाले तरी मी कोल्हापूरला जाणारच, अशी भूमिका सोमैया यांनी घेतली आहे.
हेही वाचा - नियम पाळून निर्विघ्नपणे पार पडला उत्सव, कार्यकर्त्यांची मुंबई महापौरांकडे प्रतिक्रिया