मुंबई - पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस भाजपाच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांनाच अटक करीत आहे. या वक्तव्याला राहुल गांधी ( Congress Leader Rahul Gandhi ) यांचं समर्थन आहे का? असा सवाल प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ( Bjp Spokesperson Keshav Upadhye ) यांनी उपस्थित केला आहे. तसेच कार्यकर्त्यांना अटक म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी' असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली. मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ( Keshv Upadhye Bjp PC )
राहुल गांधी यांचं समर्थन आहे का?
उपाध्ये म्हणाले की, आपण पंतप्रधानांबद्दल बोललोच नव्हतो, असा खुलासा पटोले यांनी केला असून हा खुलासा हास्यास्पद आहे. चोर तो चोर वर शिरजोर असाच हा प्रकार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करताना जो न्याय लावला तोच न्याय पटोले यांनाही लावावा. पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या पटोलेंविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस तयार नाहीत. मागील सात-आठ वर्षात काँग्रेस सातत्याने पराभूत झाली आहे. महात्मा गांधींचा वारसा काँग्रेस सांगत आहे व अशा हिंसात्मक गोष्टीसाठी काँग्रेस पुढाकार घेत आहे. राहुल गांधी यांच यास समर्थन आहे का? असही उपाध्ये म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पटोले यांची भाषा मान्य आहे का? असा प्रश्नही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग थंडावला -
कोरोनाविरोधी लसीकरणाच्या मोहिमेत देशाने उच्चांकी आघाडी घेतलेली असताना महाराष्ट्रात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळे लसीकरणाचा वेग थंडावल्याने कोरोनाचे भय कायम राहिले आहे, असा थेट ठपका उपाध्ये यांनी यावेळी ठेवला. ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणावर लसीकरणापासून वंचित राहात असल्याचे सहा महिन्यांपूर्वीच स्पष्ट होऊनदेखील पंतप्रधानांचा सल्ला झुगारून निष्काळजीपणा कायम ठेवण्याच्या ठाकरी हट्टाचे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेस भोगावे लागत आहेत. या हट्टामुळेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रास बसला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा - नाना पटोले, 'त्या' गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा, माधव भांडारी यांचे खुले आव्हान
कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार जनतेस दाखवत होते. मात्र, लसीकरणाचा वेग वाढवून नागरिकांना सुरक्षित करण्याऐवजी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत ते स्वतःदेखील घरातच बसून राहिले. सर्व व्यवहार गुंडाळून व घराबाहेर जाणे टाळून ही लाट थोपविण्याचा मुख्यमंत्र्यांचा अजब 'गनिमी कावा' महाराष्ट्राच्या अंगलट आला असून, देश लसीकरणाचा विक्रम करत असताना महाराष्ट्रात मात्र फैलावाचा विक्रम होत आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला. मुख्यमंत्री स्वतःदेखील घरात बसून राहिले, आणि यंत्रणा सुस्तावल्यानंतरही सरकारला जाग आली नाही. सरकारच्या या बेफिकीरीमुळेच महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यांतील लसीकरणाचे प्रमाण ६० टक्क्क्यांहूनही कमी राहिले, असा आरोप उपाध्ये यांनी केला.