मुंबई - गावात पोलीस आले, की पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले पुढे तेच स्वातंत्र्य सैनिक झाले, असल्याचे वक्तव्य विधासभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांच्या योगदानाची युवा पिढीला माहिती मिळावी म्हणून स्वातंत्र सैनिक बाबासाहेब परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने सायन्स सर्कल येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात ज्या कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग घेतला त्यांना अजूनही स्वतंत्र सेनानी म्हणून मान्यता मिळत नाही. परंतु, गावात पोलीस आले की, पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले तेच पुढे स्वातंत्र्य सैनिक झाले, असे मी सभागृहात तावातावाने बोललो व त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळी त्या खात्याचे मंत्री पात्रावला होते. ते मुंबईचे होते. सभागृह संपल्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली व माझ्याकडील सर्व कागदपत्रे नाव घेऊन सर्वांना पेन्शन व प्रमाणपत्रे दिली असल्याची आठवणही बागडे यांनी यावेळी सांगितली.
बागडे पुढे म्हणाले, जी काही स्वातंत्र्य सैनिकांची धग होती ती पुढे लुप्त होत गेली. पण त्यांचा लढा दुष्मनाच्या नाकी नऊ आणत होता. तेव्हा तरुण पिढीला अशा प्रकारच्या कार्यक्रम आयोजन करून देशभक्ती व देश स्वतंत्र करण्यासाठी लागलेला संघर्षाची माहिती दिली पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी बागडे यांनी व्यक्त केली.