मुंबई - भंडार्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये नवजात अतिदक्षता केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी रुग्णालयाच्या दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारिका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके, अशी या दोघींची नावे असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आज रुग्णालयातील दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिचारिकांच्या निष्काळजीपणाने ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. या कारवाईविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
'39 दिवसानंतर दोन कंत्राटी परिचारिकांवर यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भंडारा जळीतकांडात दोन परिचारिकांवर गुन्हा दाखल झाल्यावर इतर सर्वांनी स्वत:चा बचाव केलाय. अग्निशमन यंत्रणा चालत नव्हती, या बाबीला प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन परिचारिकांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती. मग त्या परिचारिकांचा यात काय दोष आहे? आणि पीडब्लूडीचे अधिकारी काय झोपले होते का आग लागेपर्यंत? हे तर 'अंधेर नगरी आणि चौपट राजा'सारखे काम आहे आणि सरकार संवेदनाहीन झाले आहे,' असा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
काय घडली होती घटना?
भंडार्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिशु केअर युनिटला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले होते. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालके होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, या घटनेमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या रुग्णालयात लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला होता. यासह रुग्णालयात अग्निशमन यंत्रणात अस्तित्वात नसल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले होते.
डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप
या प्रकरणात सुरुवातीला शासनाने अतिशय दिरंगाई केली. या संदर्भात 39 दिवसांनंतर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यात केवळ दोन परिचारिकांवर कारवाई करून इतर डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप खासदार सुनील मेंढे यांनी केलेला आहे. तर, आम्ही आमचे कर्तव्य बजावत होतो. ही चूक आमची नसून शासकीय यंत्रणेची असल्याचा परिचारिकेने सांगितले.
हे प्रकरण अतिशय गंभीर असून यानंतर अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत यासाठी शासनाने काहीतरी ठोस पावले उचलावी आणि उर्वरित लोकांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी मेंढे यांनी यावेळी केली.
आमचा दोष नसून प्रशासनाचा दोष असल्याचे परिचारिकेने सांगितले
'घटनेच्या दिवशी आम्ही सर्व बालकांना फीडिंग झाल्यानंतर रेकॉर्ड भरण्याचे काम करीत होतो. हे काम करण्यासाठी केअर युनिटच्या बाहेर व्यवस्था करण्यात आली असल्याने आम्ही बाहेर बसून रेकॉर्ड भरण्याचे काम करीत होतो. अचानक आवाज आल्यानंतर आम्ही आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र धुरामुळे आत जाणे शक्य झाले नसल्याने आम्ही मुलांना वाचवू शकलो नाही. मात्र, आम्ही त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या बिल्डिंगमध्ये फायर अलार्म आणि फायर एक्झिट असते तर, या मुलांना नक्कीच वाचविता आले असते. त्यामुळे हा दोष आमचा नसून शासनाने इमारत बांधल्यानंतर जी यंत्रणा उभारायला हवी होती, ती न उभारल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे ही चूक प्रशासनाची आहे, असे गुन्हा दाखल झालेल्या परिचारिकेने सांगितले. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. आम्ही तेथून निर्दोष सिद्ध होऊ,' असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. या दोन्ही परिचारिकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून 22 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पोलीस त्यांना अटक करतात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.